मराठी नाव – कार
शास्त्रीय नाव - Canthium coromandelicum
गावाकड ओसाड माळरानावर जनावरांमाग उन्हातान्हात फिरत असताना अचानक एखाद हिरवगार झुडुप दिसाव अन त्यात रसाळ मधाळ टपो-या फळांनी लवकडलेली कार दिसावी यासारखा दुग्धशर्करा योग दुसरा कोणता नसावा. साधारण आम्हाला कळतय अस कार, बोर, गोदन, कांगुण्या, भोकर, शिंगुळ्या आम्ही न चुकता आणी आवडीने खायचो पावसाळ्यात ओढ्यामधे खेकडे, छोटे छोटे मासे पकडणे, पकडलेले खेकडे मासे रानातच शिजवुन खाणे. हे सगळ करत असताना दिवस बुडाल्याच देखील कळत नव्हत परत दिवे लागणीला जनावर घराकड माघारी फिरत असत. तस पाहिल तर आमची वस्ती भोजलींग देवाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेली, सभोवती सर्व बाजुने टेकड्या आणी वस्तीसमोर शेतजमीन, पाच सहा नंबरातली मोकळी जमीन त्यात बहारदार अशी झाडी, तेवढ्याच दमदार वघळी आणि ओढे, दुष्काळात तयार झालेले पाझर तलाव, मोठ मोठ्या नालाबंडीग ह्या सगळ्या नैसर्गीक जमेच्या बाजुमुळे डोंगरावर पाऊस झाला की पाणी सरळ वढ्याला यायच आणि आमचा शेत शिवार फुलायचा. हे सगळ फक्त आणि फक्त समाधानकारक पाऊस पडल्यावरच अनुभवायला भारी आहे नाहीतर आम्हाला दुष्काळ हा पाचवीला पुजलेलाच आहे. कधीकाळी मिरगाच्या पावसान फसवल की पिकापान्याची, जनावरांची आणि पर्यायाने स्थानिक रहीवाशांची काय दैना होते हे अनुभवायला तो माणदेशीच असायला हवा. कारण सांगुन अनुभव समजत नाहित काही काही अनुभव हे स्वतः अनुभवले तरच दुस-याचे दुखः आणि त्या संकटाची तिव्रता समजते. असो हे दुष्काळाच गा-हाण काय सांगुन तुम्हाला समजणार तर कधी तरी एप्रील मे महिन्यात या आमच्याकडे दुष्काळ निसर्ग पर्यटनाला.
कार, बोर, कांगुण्या खायला वढ्यात पवायला मिळाव म्हणुनच तर जनावरांमाग देखील जायचो. काळाच्या ओघात म्हणा की वाढत्या शहरीकरणामुळे तसेच बदलत्या जिवनशैलीमुळे या अश्या रानमेव्याकडे अजाणतेपणी दुर्लक्ष होत आहे, किंबहुना ब-याच जणांना ही फळ माहित देखील नाहित. साधारण गावठी (देशी) बोरासारख़े दिसणारे कच्चे असताना गर्द हिरवे आणि पिकण्याआधी पिवळसर, पिकल्यावर पिवळसर तपकीरी अस दिसणार दोन बिया असलेले रसाळ, मधाळ पिकलेल फळ तोंडात टाकल की पटकन विरघळणार, एखाद कच्च पिवळसर फळ पिकलय म्ह्णुन खाल्ल कि तुरट लागणार अस हे कारीच फळ आता ठरावीक ठिकाणीच उरल आहे. या झाडाला अणकुचीदार काटे असल्यामुळे तसेच जळाऊ लाकूड म्हणुन याचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतो. यामुळे ही झुडुप केवळ नाममात्रच उरली आहेत. हे झुडुप असल तरी काही काही ठिकाणी झाडाचा आधार घेवुन दहा ते पंधरा फुटापर्यंत याची वाढ झालेली पहायला मिळते. एकाच उंचीवर परस्पर विरोधी असणारे काटे सरळ आणि धारदार असतात. या झाडाची पाने शेळ्या, मेंढ्याचे आवडीचे खाद्य आहे. काट्याखाली असणारी पाने शेळ्या,मेंढ्या अगदी अलगद खातात. तसेच बुलबुल, मुनिया खारुताई ह्यादेखील कारीची फळे आवडीने खातात.
- वाघमोडे यांचा दौलतराजे, बनगरवाडी.
No comments:
Post a Comment