Sunday, March 19, 2023

international Sparrow Day

निमित्त जागतिक चिमणी दिनाचे .....     
            साधारण जस समजायला लागलय तस... आम्ही आमच्या गावच्या घरी ज्वारी आणि मक्याची शेलकी कणसं एकत्र बांधून लगला आडकवलेली  पाहिली आहेत. त्यावेळी मनात एकच विचार यायचा की का बर ही कणसं आडकवली असतील? अन ह्या चिमण्या शेतात, मळ्यात धान्य खातात मग इथ का अजून पुन्हा दाणे खायला येतात? ... हा प्रश्न सतत भंडावून सोडायचा. विचार करून थकल्यावर मी नेहमीप्रमाणे आजोबांना विचारले की आबा ही कणसं अशी का इथ टांगलीत? ... तर त्यावर त्यांनी अगदी माफक शब्दात सांगितल की ह्याच्या माग दोन कारण आहेत एक म्हणजे आपल्याकडे बारमाही पीक नसत अन् त्यामुळे पक्षांना खायला काही मिळत नाही. अन् दुसरं म्हणजे जर पक्ष्यांच्या हातून जर काही शिल्लक राहील तर ते आपण पुढच्या वर्षी बियाणं म्हणून वापरायचे. उत्तर सरळ होत पण मला काही पटल नाही की पक्षांना मळ्यात पण खायला द्यायच अन् घरी पण हे कस काय?        
                        त्यावेळी आबा म्हणाले की मोठा झालास की कळेल....                                                                                                                                      त्यावेळी मी तो विषय तिथेच सोडून दिला. काही दिवसानी किंबहुना एक दोन वर्षानी साधारण २००४ ते २००६ च्या दरम्यान आमच्या तालुक्याला एक भयंकर दुष्काळ पडला सुरुवातीला पाण्याची टंचाई जाणवू लागली, पाण्यासाठी लोक इतरत्र भटकू लागली, विहिरीची खोली वाढत गेली, पायऱ्या नसणाऱ्या विहिरीत लोक साखळी करून जीवावर उदार होऊन एका कळशीपायी भांडण करू लागली, सात ते आठ परसावरून लोक पाणी शेंदूण काढू लागली, सायकलीला आकड्यां वापरून लोक पाण्याची वाहतुक करू लागले, दोन दिवसाशीवाय आंघोळ मिळेनाशी झाली, लोक गढूळ पाणी देखील जपून वापरायला लागली, काही दिवसानी विहिरी देखील आटल्या मग जवळपासच्या तळ्यातील पाणी टँकरने चार पाच दिवसाआढ यायला लागल.. एकीकडे माणसांची ही परवड होत होती तर दुसरीकडे पिकांनी अन् जनावरांनी माना टाकायला सुरुवात केली होती. पीक अक्षरशः जाग्यावर करपून गेली होती. ज्वारीला तर पान म्हणून कसल दिसत नव्हत. शेळ्या- मेंढ्याची पोट पाक भकाळीला गेली होती, नाईलाजास्तव लोक आपल लाडक पशुधन ईकत होती,  दुभत्या जनावरांच्या अंगावर कळा राहिली नव्हती, भाकड जनावरांना घ्यायला खाटीक सुध्दा धजावत नव्हते, अन् चारा छावणी घर शेतापासून दूर होत्या.
           आंबा, चिंच, जांभळ ह्यासारखी झाड शेंड्याकडून करपत चालली होती. जिवांचे अगदी हालहाल चालले होते. आम्ही शहरातून सुटी साठी आलो होतो पण हे द्रूश्य पाहून काही सुचेनास झाल होत पण ह्यासाठी काहीच करता येत नव्हत.फारतर जवळपासच्या वीहीरीतल पाणी शेंदून आणायला  मदत करण अथवा सायकल वरून घागरी वाहायला मदत करण एवढच करण्यासारख होत. एखाद्या झाडाला पाणी घालाव तर वापरायला पाणी नाही.
            पक्ष्यांना खायला प्यायला पाणी मिळणं कठीण झाल होत, पक्षी तर तडफडून  मरत होते, एकेकाळी मुक्त विहार करत फिरणारी घरचिमणी हि त्यावेळी क्वचित दिसत होती, अन माळावर चिमण्या आहेत कि नाहीत हा प्रश्नच पडत असे. ब-याचदा ह्या चिमण्याना अगदी घरात आमच्या माळवदाच्या घरातील लगवर, एखाद्या घरातील फोटोमागे घरटी करताना तसेच घरात चिवचिवाट करत मुक्त विहार करताना पाहिल आहे. ब-याच लोकाना आताकुठे निर्जंतुकीकरणाच महत्व पटायला लागलय पण  हे  छोटे छोटे पक्षी अगदी मुक्तपणे धुळीने आंघोळ करुन आपले शरिर निर्जंतुक ठेवल जायच. त्यावेळचा तिचा वावर आताच्या घडीला खुप काही सांगून जातो. चिमणी कावळ्याच्या गोष्टी मधली चिमणी अगदी त्या गोष्टी पुरतीच राहतेय की काय असे वाटतेय. आज तिचा निवाराच अगदी संपुष्टात आल्याने अन् अशातच वाढत्या मोबाईल टॉवरमुळे चिमणी अन् ईतर लहान जिव यांच अस्तित्वच धोक्याच्या पातळीच्या वर गेल आहे.  त्यावेळी मला ही कणसं टांगून ठेवण्यामागच कारण अगदी उदाहरणासहीत समजल. अन् त्यादिवशीच ठरवल की आपल्याला शक्य होईल तेवढ तरी ह्या मुक्या पक्ष्यांना आपण दिल पाहिजे अन् कुणी तरी म्हटलं पण आहे की , " दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम..." त्यासाठी जमेल तस पाणी भांड्यात, गाडगे, मडक्यात ठेवण, खायला धान्य ठेवण हे चालू केल. 
        आपण फक्त निमित्तमात्र म्हणून हां केलेला अट्टहास ......
 आपलाच- वाघमोडे यांचा दौलतराजे, बनगरवाडी .

Thursday, September 8, 2022

कार

मराठी नाव – कार  
शास्त्रीय  नाव -  Canthium coromandelicum
         गावाकड ओसाड माळरानावर जनावरांमाग उन्हातान्हात फिरत असताना अचानक एखाद हिरवगार झुडुप दिसाव अन त्यात रसाळ मधाळ टपो-या फळांनी लवकडलेली कार दिसावी यासारखा दुग्धशर्करा योग दुसरा कोणता नसावा. साधारण आम्हाला कळतय अस कार, बोर, गोदन, कांगुण्या, भोकर, शिंगुळ्या आम्ही न चुकता आणी आवडीने खायचो पावसाळ्यात ओढ्यामधे खेकडे, छोटे छोटे मासे पकडणे, पकडलेले खेकडे मासे रानातच शिजवुन खाणे. हे सगळ करत असताना दिवस बुडाल्याच देखील कळत नव्हत परत दिवे लागणीला जनावर घराकड माघारी फिरत असत. तस पाहिल तर आमची वस्ती भोजलींग देवाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेली, सभोवती सर्व बाजुने टेकड्या आणी वस्तीसमोर शेतजमीन, पाच सहा नंबरातली मोकळी जमीन त्यात बहारदार अशी झाडी, तेवढ्याच दमदार वघळी आणि ओढे, दुष्काळात तयार झालेले पाझर तलाव, मोठ मोठ्या नालाबंडीग  ह्या सगळ्या नैसर्गीक जमेच्या बाजुमुळे डोंगरावर पाऊस झाला की पाणी सरळ वढ्याला यायच आणि आमचा शेत शिवार फुलायचा. हे सगळ फक्त आणि फक्त समाधानकारक पाऊस पडल्यावरच अनुभवायला भारी आहे नाहीतर आम्हाला दुष्काळ हा पाचवीला पुजलेलाच आहे. कधीकाळी मिरगाच्या पावसान फसवल की पिकापान्याची, जनावरांची आणि पर्यायाने स्थानिक रहीवाशांची काय दैना होते हे अनुभवायला तो माणदेशीच असायला हवा. कारण सांगुन अनुभव समजत नाहित काही काही अनुभव हे स्वतः अनुभवले तरच दुस-याचे दुखः आणि त्या संकटाची तिव्रता समजते. असो हे दुष्काळाच गा-हाण काय सांगुन तुम्हाला समजणार  तर कधी तरी एप्रील मे महिन्यात या आमच्याकडे दुष्काळ निसर्ग  पर्यटनाला. 
              कार, बोर, कांगुण्या खायला वढ्यात पवायला मिळाव म्हणुनच तर जनावरांमाग देखील जायचो. काळाच्या ओघात म्हणा की वाढत्या शहरीकरणामुळे तसेच बदलत्या जिवनशैलीमुळे या अश्या रानमेव्याकडे अजाणतेपणी दुर्लक्ष होत आहे, किंबहुना ब-याच जणांना ही फळ माहित देखील नाहित.  साधारण गावठी (देशी) बोरासारख़े दिसणारे कच्चे असताना गर्द हिरवे आणि पिकण्याआधी पिवळसर, पिकल्यावर पिवळसर तपकीरी अस दिसणार दोन बिया असलेले रसाळ, मधाळ पिकलेल फळ तोंडात टाकल की पटकन विरघळणार, एखाद कच्च पिवळसर फळ पिकलय म्ह्णुन खाल्ल कि तुरट लागणार अस हे कारीच फळ आता ठरावीक ठिकाणीच उरल आहे. या झाडाला अणकुचीदार काटे असल्यामुळे तसेच जळाऊ लाकूड म्हणुन याचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतो. यामुळे ही झुडुप केवळ नाममात्रच उरली आहेत. हे झुडुप असल तरी काही काही ठिकाणी झाडाचा आधार घेवुन दहा ते पंधरा फुटापर्यंत याची वाढ  झालेली पहायला मिळते. एकाच उंचीवर परस्पर विरोधी असणारे काटे सरळ आणि धारदार असतात. या झाडाची पाने शेळ्या, मेंढ्याचे आवडीचे खाद्य आहे. काट्याखाली असणारी पाने शेळ्या,मेंढ्या अगदी अलगद खातात. तसेच बुलबुल, मुनिया खारुताई ह्यादेखील कारीची फळे आवडीने खातात.
- वाघमोडे यांचा दौलतराजे, बनगरवाडी.

Saturday, September 3, 2022

रंगीत सरडा





मराठी नाव - रंगीत सरडा 
Scientific Name- Chamaeleo zeylanicus
Location- Bangarwadi 
August 2022

Sunday, August 21, 2022

रानकांदा

मराठी नाव - रानकांदा 
Scientific Name- Drimia indica
Location- Bangarwadi 
August 2022

Saturday, August 20, 2022

शिंगुळ्या

मराठी नाव - शिंगुळ्या 
Scientific Name- Caralluma adscendens (Roxb.) Haw
Location- Bangarwadi 
August 2022

Monday, January 17, 2022

भोगी

भोगी ..... अनुभवा आजच्या दिवशी मिक्स व्हेज चा अनोखा नजराणा ... जास्तीत जास्त पालेभाज्या व फळभाज्या यांची विविधता असणार खेंदाट .....बाजरीची भाकरी ती ही तीळ लावलेली, शेंगदाणे, जवसाची चटणी सोबत तोंडी लावायला कांद्याची पात, दही आणि राळ्याचा भात हे सर्व सुर्य मकर राशीत प्रवेश करत असताना खायला मिळणे म्हणजे भाग्यच समजा (काही लोकांना मिक्स भाज्या आवडत नाहीत म्हणुन) हिवाळ्यात उभारा देणारा असा हां आहार  सर्वानी कमीत कमीत एकदा खाव अशी भाजी आणि बाजरीची भाकरी अशी ही आपली संस्क्रुति आणि परंपरा.... परंपरा जपा संस्क्रुति टिकेल,  पालेभाजी फळभाजी जैवविविधता टिकेल..

 तुम्हाला व तुमच्या परिवाराला भोगी व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा* 💐💐💐
-आपलाच वाघमोडे यांचा दौलतराजे, बनगरवाडी .

तृण पिलाती............

तृण पिलाती............ 
आक्रमक विदेशी टणटणी झुडुपाच्या सुंदर अश्या फुलावर मकरंदाचा आस्वाद घेताना तृण पिलाती फुलपाखरु........